पुणे :
BBNA Pune Chapter चा प्रथम वर्धापन दिन पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. व्यवसाय वृद्धी, नेटवर्किंग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक डॉ. किशोर सरपोतदार, उद्योजिका अमृता देगावकर तसेच उद्योग आघाडी प्रमुख विश्वजीत देशपांडे उपस्थित होते. याशिवाय स्वीकृत नगरसेवक उदय लेले, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वप्नाली पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद आणि नामगजराने झाली. त्यानंतर बीबीएनएचे संस्थापक धनंजय खाडिलकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास, उद्दिष्टे आणि भावी योजनांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी डॉ. किशोर सरपोतदार यांनी व्यवसायात सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकांशी अगत्यशील वर्तन याचे महत्त्व अधोरेखित करत पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्याबाबत मार्गदर्शन केले. तर अमृता देगावकर यांनी महिला उद्योजिकांसाठी व्यवस्थापन, नियोजन आणि एसओपी आधारित व्यवसाय पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या समन्वयकांबरोबर व्यवसायिक संधी, नेटवर्किंग, टायअप्स आणि विविध चॅप्टर्समधील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योग आघाडी प्रमुख विश्वजीत देशपांडे यांनी महिला सक्षमीकरणासाठी फूड स्टॉल, फूड ट्रक उपक्रम तसेच विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले.
बीबीएनए ही ८०जी मान्यता प्राप्त संस्था असून, उद्योजकांना नेटवर्किंग, व्यवसाय वृद्धी, महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था करत आहे.
यावेळी बीबीएनएच्या वतीने आगामी पालखी सेवा उपक्रम, व्यवसायिक प्रदर्शन, विभागनिहाय बैठका आणि विविध सामाजिक प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून आलेले समन्वयक, उद्योजक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


