Train News | मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे भारतातील पहिल्या हायड्रोजन-चालित ट्रेनचं उद्धाटन केलं. जिंद ते सोनीपत दरम्यान धावणारी ही ट्रेन स्वच्छ आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केलेल्या या ट्रेनमुळं भारत हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञानात जगातील अग्रेसर देशांमध्ये सामील झाला आहे.
भारताची स्वदेशी हायड्रोजन ट्रेन : पंतप्रधान मोदी यांनी जिंद रेल्वे स्टेशनवरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन पूर्णपणे भारतात डिझाइन, इंजिनिअर आणि इंटिग्रेट करण्यात आली आहे. १० कोच असलेली ही ट्रेन सुमारे २,६०० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. जगातील इतर हायड्रोजन ट्रेन (जर्मनी, चीन) सामान्यत: २-३ कोचांच्या असतात, तर भारतानं १० कोचांची क्षमता साध्य करून नवा विक्रम केला आहे. ट्रेनमध्ये ३,२०० हॉर्सपॉवरचं प्रोपल्शन सिस्टम आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान वापरून ही ट्रेन चालते. हायड्रोजनला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करणाऱ्या या प्रक्रियेत फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते आणि कोणतेही कार्बन उत्सर्जन होत नाही. पारंपरिक विद्युत ट्रेनप्रमाणे ओव्हरहेड वायरची गरज नसल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातही ही ट्रेन उपयुक्त ठरेल.
सुरक्षा आणि तंत्रज्ञान : ट्रेनमध्ये हायड्रोजन गळती, उष्णता, ज्वाला आणि धुराचा शोध घेणारे बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेचे उपकरण बसवण्यात आलं आहे. जिंद येथे हायड्रोजन सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलं असून, सुरक्षित आणि विश्वासार्ह ऑपरेशन सुनिश्चित करण्यात आला आहे. ही ट्रेन पर्यावरणस्नेही असल्याने रेल्वे क्षेत्रातील हरित क्रांतीचं प्रतीक बनली आहे.
विकास प्रकल्पांचे उद्धाटन : जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधानांनी सुमारे १४,७०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधितही केलं. नंतर ते पंजाबातील जालंधर येथे जाऊन ५,४७० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शिलान्यास आणि उद्धाटन करतील. या भेटीत पंतप्रधान हरियाणा, चंदीगढ आणि पंजाब या तीन राज्य/केंद्रशासित प्रदेशांना भेट देत आहेत. यावेळी स्थानिक विकासाला चालना देणे आणि राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या यशामुळे भारत जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिकासारख्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. मात्र, क्षमता आणि शक्तीच्या बाबतीत भारतानं इतर देशांना मागं टाकलं आहे. हे तंत्रज्ञान रेल्वे क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. भविष्यात अशा आणखी ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आहे.
ही ट्रेन केवळ वाहतुकीचं साधन नाही तर आत्मनिर्भर भारत आणि हरित भारताच्या संकल्पनेचं प्रतीक आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक इंजिनिअरग यांचा सुंदर संगम या प्रकल्पात दिसून येतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञानात जगाला मार्गदर्शन करत आहे.
English Title – India’s First Hydrogen Train Begins Operations


