सध्या देशात उष्णतेची लाट सुरु असताना पुण्यात सुद्धा तापमाने उच्चांक गाठला आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच (PuNe Weather Update) वाढ झाली आहे. या तापमानामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहे. पुण्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 43.1 तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे पुणेकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. काम नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, भरपूर पाणी पित रहा, अशा सूचना हवामान खात्याकडून पुणेकरांना देण्यात आल्या आहेत. ढमढेरे येथे सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क येथे 43.4 अंश सेल्सिअस, शिरूर येथे 43.1 अंश सेल्सिअस आणि वडगाव शेरी येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 18 एप्रिल रोजी शिवाजीनगर येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर 28 एप्रिल रोजी 41.3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. सध्याचे तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे.पुण्यातील तापमानाची पातळी वाढण्यामागचे कारण सांगताना भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) पुणे येथील हवामान व अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, ‘कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुजरातमधून उष्ण हवा येत आहे. या भागात यंदा चांगला पाऊस झाला नाही, मान्सूनपूर्व पाऊसही पुरेसा झाला नाही, परिणामी जमीन कोरडी पडली असून ती अधिक तापत आहे.