चिंचवड- – व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांचे जीवन परमेष्ठीकडे नेण्याचे कार्य धर्म करतो. समाजाच्या एकत्वाचा आधार असलेला हा धर्म व्यवहारातून प्रकट व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.▪️चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव आदि उपस्थित होते.▪️पूजा आणि सोहळ्याच्या पलिकडे जात संतपुरूषांचे जीवन आपण आत्मसात करावे. त्यांनी केलेल्या कार्याच्या दिशेला निदान काही पाऊले चालायला हवे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संपूर्ण जगाची मांडणी संघर्षावर आधारित आहे. गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आपले जीवन आहे. त्याने सुविधा वाढल्या पण निरंतर कलह देखील उत्पन्न होत आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अध्यात्माच्या आधारावर भौतिक जीवन सुखकर करणारा शाश्वत सनातन धर्म आत्मसात केला. त्यातील आपलेपणा हाच विश्वाचा आधार आहे.” कार्यक्रमात संस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मूर्तिकार तन्मय पेंडसे यांनी तयार केलेली मोरया गोसावी यांची मूर्ती, पुणेरी पगडी, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी केले. तर स्वागत विश्वस्त जितेंद्र देव यांनी केले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन, तर ॲड. देवराज डहाळे यांनी आभार मानले.
▪️चिंचवडमध्ये देवस्थान कॉरिडॉर – आयुक्त ः
पिंपरी चिंचवड महापालिकेतील आळंदी, देहू आणि मोरया गोसावी देवस्थानचा कॉरिडॉर विकसित व्हायला हवा, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,”केंद्राच्या प्रसाद योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील या मुख्य देवस्थानांचा कॉरिडॉर विकास व्हायला हवा. नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य चालू असून, लवकरच पवना नदी सुधार प्रकल्प देखील पूर्ण होईल.”
समाजाला सुरक्षित आणि वैभवसंपन्न ठेवण्याचे कार्य धर्म करतो. तो जोडतो आणि उन्नत करतो, हा धर्म अतिवादाला थारा देत नाही. सर्वांच्या जीवनाचा आधार असलेला हा धर्म टिकला पाहिजे आणि देशकाल परिस्थितीनुसार त्याचे जागरण व्हावे.
- डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ