पुणे -पुणे शहरात रेल्वे, खासगी बसच्या माध्यमातून रात्री- अपरात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रात्री आलेल्या प्रवाशांची खासगी वाहनचालकांकडून आर्थिक लूट होत होती. त्यामुळे पीएमपीने पुण्यात पाच मार्गांवर रातराणी बस सुरू केली. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून मागणी असलेल्या पुणे स्टेशन ते निगडी मार्गावर ‘रातराणी बस’ सुविधा सुरू झाली. त्यामुळे पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून पिंपरी चिंचवडला रात्री-अपरात्री जाणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.त्यामुळे पुणे शहरातील प्रवाशांची सोय झाली होती. मात्र, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून पिंपरी- चिंचवड परिसरात जाणाऱ्यांसाठी काहीही सोय नव्हती. त्यामुळे पिंपरी चिंचवडसाठी देखील एक रातराणी बस सुरू करण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार पीएमपीने पुणे स्टेशन ते निगडी मार्गवर पीएमपीची रातराणी सेवा सुरू केली आहे. निगडी आगारातून दररोज रात्री ११.३० वाजता आणि पुणे स्टेशनवरून १२.३० वाजता पहिली बस सुटणार आहे. रातराणी बस प्रवासासाठी प्रवाशांना दिवसाच्या तिकीट दरापेक्षा ५ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.