पुणे, : पेमेंट सेवांमध्ये जागतिक अग्रणी कंपनी असलेल्या वर्ल्डलाईन (युरोनेक्स्ट: डब्ल्यूएलएन) ने भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात विश्वासार्ह सहकारी बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. याद्वारे प्रगत आणि मोठ्या प्रमाणावरील पेमेंट सोल्यूशन्सद्वारे डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यात येणार आहे.
ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि नियामकांच्या प्रगतीसह भारताची आर्थिक परिसंस्था वेगाने विकसित होत आहे. अशा वेळेस पारंपारिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करतानाच वंचित घटकांपर्यंत स्वतःची पोहोच वाढवणे अशा दुहेरी आव्हानांना सहकारी बँकांना तोंड द्यावे लागते. या सहकार्यामुळे कॉसमॉस बँक एका मजबूत व भविष्यासाठी तयार असलेली डिजिटल पेमेंट प्रणालीने सुसज्ज होणार आहे. त्यातून बँकेला या आव्हानांना तोंड देता येणार आहे.
प्रमुख क्षेत्रांमध्ये कॉसमॉस बँकेची क्षमता बळकट करण्यावर ही भागीदारी केंद्रित असणार असून त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश असेल. एकात्मिक पेमेंट स्वीकृती उत्पादनामुळे ग्राहकांना अखंड पेमेंट व्यवहार अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. पेमेंट आणि नॉन-पेमेंट अशा दोन्ही वापराच्या प्रकरणांसाठी विशेष उपाय उपलब्ध होतील. बँकेला पोर्टफोलिओच्या स्थितीचे रिअल-टाइम दृश्य प्रदान करण्यासाठी 360-अंशातील डेटा विश्लेषण उपलब्ध होईल.
मोठ्या प्रमाणातील आणि कामकाजातील कार्यक्षमतेसाठी कामगिरीशी तडजोड न करता वाढत्या व्यवहारांच्या प्रमाणात आणि विविध ग्राहकांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी स्केलेबल पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये निवड करण्यासाठी अनेक मूल्यवर्धित सेवा असतील. ग्राहकांच्या अपेक्षांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि डाउनटाइम कमी करण्यासाठी अनुभवी विक्री, संबंध आणि सेवा टीम तैनात असेल.
वर्ल्डलाईन इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष शेख मोहिदीन म्हणाले, “कॉसमॉस बँकेच्या डिजिटल प्रवासाला बळ देण्यासाठी त्यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. वर्ल्डलाईनमध्ये आम्ही विशिष्ट पेमेंटची आव्हाने समजून घेतो. दीर्घकालीन मूल्य वाढवणारे नाविन्यपूर्ण, सुरक्षित आणि कार्यक्षम पेमेंट अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. “
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आरती ढोले म्हणाल्या, “या सहकार्यामुळे केवळ आमच्या पेमेंट पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार नाही तर आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचे बँकिंग अनुभव देण्याच्या आमच्या कटिबद्धतेलाही पुष्टी मिळाली आहे. आजच्या धावपळीच्या आर्थिक वातावरणात, नावीन्यपूर्णतेद्वारे पुढे राहणे महत्त्वाचे आहे आणि ते साध्य करण्यात मदत करण्यासाठी वर्ल्डलाईन हा आदर्श भागीदार आहे.”
डिजिटल नाविन्यपूर्णता, आर्थिक समावेशन आणि ग्राहककेंद्रित वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या समान दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या सहकार्यामध्ये पडले आहे. यामुळे अधिक लवचिक आणि भविष्यासाठी तयार बँकिंग परिसंस्थेचा मार्ग मोकळा होणार आहे.