पुणे : “स्वामी विवेकानंदांच्या तत्वनिष्ठ व विवेकनिष्ठ विचारांनी प्रेरित तरुणच उद्याचा वैभवशाली भारत घडवतील”, असा विश्वास माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो सीनियर कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी विश्वबंधुत्व दिनानिमित्त धर्माधिकारी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत, नागेश पाटील, तसेच राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. रवींद्र गोरे उपस्थित होते.

धर्माधिकारी म्हणाले, “स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या विचारसरणीने जगाच्या वाटचालीला वेगळी दिशा दिली. आजच्या तरुणांनी आत्मपरीक्षण करून स्वतःच्या आयुष्यात काही घडविण्याचा संकल्प केला पाहिजे. विज्ञाननिष्ठ, तत्वनिष्ठ आणि विवेकनिष्ठ तरुण पिढीच खरी बलशाली भारताची उभारणी करेल.”
ते पुढे म्हणाले की, तरुणांनी एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्यामध्ये स्वतःला झोकून द्यावे. “व्यसनांना प्रतिष्ठा मिळत असलेल्या समाजात कार्य आणि प्रामाणिकपणाला महत्त्व मिळाले, तरच खरी बदलाची प्रक्रिया घडेल,” असेही त्यांनी अधोरेखित केले.