गदिमांप्रमाणे कोथरूड मध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजींचे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने गीतरामायणाचे कवी ग. द. माडगूळकर यांचे स्मारक कोथरुड मध्ये उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे संगीतकार असलेल्या सुधीरजी फडके यांच्या कार्यास साजेसे स्मारक कोथरुडमध्ये झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. या दोन महान शिल्पकारांची स्मृती जतन करण्याची संधी यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेला मिळणार आहे. चांदणी चौक परिसर रस्ते विकासामुळे आणि बंगलोर-मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोथरुडजवळूनच जात असल्यामुळे हे स्मारक कोथरुड परिसरातच होणे आवश्यक वाटते.
यामुळे शहरातील वाहतुक या अडचणीशिवाय संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील रिसकांना तसेच मान्यवर मंडळींना या दोन्ही स्मारकांमध्ये जाणे सोयीचे होईल. महाराष्ट्रातील आणि विदेशातील सुद्धा लक्षावधी रिसकांकडून पुणे महानगरपालिकेच्या या सांस्कृतिक कामाची नोंद घेतली जाईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुधीरजी फडके यांचे उचित स्मारक कोथरुडमध्ये उभे करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना ना. पाटील यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.