पुणे, -” जीवनात यशस्वी आंत्रप्रेन्यूअर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोखिम घ्यायला शिकले पाहिजे. कोणताही कम्फर्ट झोन हा धोकादायक असल्याने त्यामध्ये राहू नये. सतत जोखीम घ्यायला शिकले पाहिजे. भविष्यकाळ हा आंत्रप्रेन्यूअरसाठी पोषक आहे. त्यामुळे चांगले भविष्य घडेल याची वाट न बघता आयडिया घेऊन प्रयत्नातून भविष्य घडवा.” असा सल्ला भारत फोर्जच्या एरोस्पेस बिझनेस व्हर्टिकलचे सीईओ गुरू प्रसाद बिस्वाल यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अँण्ड आंत्रप्रेन्यूअरशिप (राइड-२५) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे डीन प्रा.डॉ. नीरज महिंद्रू, हितेश जोशी, निनाद पाटील, डॉ. सिद्धार्थ चक्रबर्ती, डाॅ.सुमन देवादुला व डाॅ.उर्वशी मक्कर उपस्थित होते. तसेच ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू प्रसाद बिस्वाल म्हणाले,” जीवनात रिस्क न घेता कार्य करणे म्हणजे तुमच्या करिअर मधील सर्वात मोठा धोका आहे. अपयश हा एक प्रतिसाद असतो. त्यातून खूप काही शिकता येते. कोणत्याही करिअर मधील मूळ तत्व जाणून घेतले की उत्तरे आपोआप मिळतात. तंत्रज्ञानाच्या युगात एआय शी स्पर्धा करू शकत नाही. त्या सोबत सहयोग करूनच पुढे जावे लागेल. यशस्वी आंत्रप्रेन्यूअर बनायचे असेल तर प्रथम सातत्याने त्याचाच विचार करायला शिकणे गरजेचे आहे.”
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले,” राइडची संकल्पनाच मुळात युवकांसाठी रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन आणि आंत्रप्रेन्युअरशीपचे टप्पे सक्षम करणे आहे. भारताच्या प्रगतीचा आलेख पाहता देशाची अर्थव्यवस्था लवकरच तीन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्याच्या मार्गावर आहे. यासाठी नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भारतातील सध्याची परिसंस्था शिक्षण व्यवस्थेच्या पातळीवर नवोपक्रमाला आधार देण्यासाठी पुरेशी परिपक्व आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,”शिक्षणाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक परिणाम करणार्या शाश्वत, समावेशक आणि प्रगतिशील परिवर्तनावर भर देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याला बळकटी देणे हा राइड चा मुख्य उद्देश आहे. शिक्षणानंतर नोकरी ऐवजी उद्योग व्यवसायांत विचारपूर्वक निर्णय घेऊन चांगले करिअर घडवण्यासाठी हे एक योग्य माध्यम आहे.”
प्रा.निरज महेन्द्रू यांनी स्वागत पर भाषण व राईड बद्दलची विस्तृत माहिती दिली.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सिद्धार्थ चक्रबर्ती यांनी आभार मानले.