थेरगाव : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले होते. त्यानुसार चिंचवड मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी ५ प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
तालेरानगर चिंचवड येथील मतदान केंद्र क्रमांक १४७ पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे महिला मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच नवी सांगवी येथील बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्र क्रमांक ४९९ येथे युथ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर प्रेमलोक पार्क दळवीनगर येथील महात्मा फुले इंग्लिश मिडियम स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ६६ येथे अपंग मतदान केंद्र उभारण्यात येणार असून पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ३५८ येथे युनिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर रावेत गाव येथील सिटी प्राईड स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ४४ येथे मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात क्रिटीकल मतदान केंद्र, पडदानशिन मतदान केंद्र आणि निगेटिव्ह मतदान केंद्रे नाहीत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे सर्व ५६४ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ कक्षाची स्थापना
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी २०५ चिंचवड मतदारसंघाच्या थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या तसेच स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या आदी संबंधित अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहे.एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, तळ मजला, थेरगाव याठिकाणी संपर्क साधावा, असेही अनिल पवार यांनी सांगितले आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट
उमेदवारांच्या खर्चाच्या तपासण्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधिनस्त राहून कराव्यात. तसेच कोणत्याही उमेदवाराच्या खर्चामध्ये तफावत आढळल्यास संबंधितांवर नियमाधिन राहून कारवाई करावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना (आयआरएस) यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या विविध तपासण्या करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी, चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालय इमारत, थेरगाव येथे तिसऱ्या मजल्यावर निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रेम प्रकाश मीना यांनी या खर्च व्यवस्थापन कक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेतला.या पाहणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांना विविध कक्षांद्वारे चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे तसेच विविध कक्षांचे समन्वय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.