पुणे – राज्यात विधानसभेचे पडघम सुरू असतानाच मनसेने मोर्चे बांधणी करत विविध ठिकाणी उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघातील उमेदवारीबाबत मुंबई येथे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी पक्षाचे बाबू वागसकर, बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, किशोर शिंदे आदी नेते, पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तीन आणि जिल्ह्यातील दहा जागा लढविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची समजते. पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे इच्छुक आहेत. तर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून ऍड. किशोर शिंदे हे इच्छुक आहे. शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना कडवी झुंज दिली होती. यावेळी शिंदे हे पुन्हा रिंगणात असतील.
त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातही मनसेकडे उमेदवार असल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून उमेदवारीसाठी डावलेले गेलेल्या उमेदवारांना संधी द्यावी का ? याविषयावर मुंबई येथील बैठकीत चर्चा झाली. जर निवडून येण्याची क्षमता असेल तर अशा उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर वगळता इतर ठिकाणी मनसेला काही मतदारसंघ वगळता नाराज आणि बंडखोर उमेदवारांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.