मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचे जागावाटप जाहीर होणे बाकी आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. या वेळी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. शाह यांनी पुन्हा अजितदादांनाच त्यागाचा सल्ला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा मिळतील.
पवार यांनी जास्तीच्या जागांचा आग्रह सोडावा, अशी विनंती शाह यांनी बैठकीत केल्याची माहिती आहे. जवळपास अडीच तास चौघा जणांची चर्चा झाली. या वेळी महायुतीच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे. भाजप विधानसभेच्या १५५ जागा लढवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७८, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ५५ जागा लढणार, असे म्हटले जाते, तर मित्रपक्षांना प्रत्येकाला आपापल्या कोट्यातून जागा सोडायच्या आहेत. दरम्यान, दिल्लीतील बैठकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घेतले. दिल्ली दौऱ्यानंतरच्या देवदर्शनाचा संबंध जोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; मात्र पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी सगळे व्यवस्थित चालले असल्याचे सांगितले.
लवकरच आम्ही तिघे एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ, असे ते काही पत्रकारांनी जागावाटपाचे सूत्र विचारले असता, फॉर्म्युला आमचा आम्ही ठरवू. फॉर्म भरायच्या आता सगळे जागावाटप होईल, असे पवार म्हणाले. महायुतीच्या जागावाटपासाठी मुंबई ते दिल्ली बैठकांवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर चंदीगडमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली; मात्र या बैठकीनंतर शिंदे आणि शाह यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंदीगडमध्ये जागा वाटप संदर्भात बैठक झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
चंदीगडमध्ये शिंदे, पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस आणि पवार रूममधून बाहेर पडले. यानंतर शिंदे यांना शाह यांनी थांबवले. त्यानंतर १५ ते २० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही १५ ते २० मिनिटांची चर्चा होत असताना फडणवीस आणि पवार यांना मात्र हॉटेल बाहेर थांबावे लागले. शिंदे यांच्या प्रतिमेवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व खूश असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिमेचा वापर जास्तीत जास्त करावा, अशी केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.