मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या ३८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून ‘एनसीपी’चे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ, तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या या यादीमध्ये नवाब मलीक आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही, तर विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यात भुजबळ यांना पुन्हा एकदा येवला मतदार संघातून निवणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वास्तविक राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील वाद समोर आला होता. त्यामुळे आता या मतदार संघातून भुजबळ यांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असेल. विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
अजित पवार गटाच्या ३८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर, तर पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मलिक यांना भाजपचा विरोध आहे, तर पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात टिंगरे यांचे नाव समोर आल्यानंतर महायुतीला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे आता अजित पवार या तिन्ही आमदारांचा पत्ता कट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. या आधी स्टार प्रचारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. या मुद्द्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांना घेरले होते. मलिक हे यापूर्वी शरद पवार गटात होते. गेल्या वर्षीच ते अजित पवार गटात सामील झाले. शरद पवार गटात असताना मलिक अनेकदा भाजपवर हल्लाबोल करायचे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. आता अजित पवार गटात सामील झाल्यानंतर पक्षाने त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीतही समावेश केला नसल्याने शरद पवार गटाने टीका केली होती. आता उमदेवारांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मलिक यांना उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरातील सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. लगेचच पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. इगतपुरीतून हिरामण खोसकर आणि खोडके काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन आमदारांवर काँग्रेसने यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली होती. भाजपतून आलेल्या राजकुमार बडोले यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.