पुणे : वडगाव शेरी मतदारसंघ भाजपकडे राहण्यासंदर्भात काेणतीच चर्चा महायुतीच्या जागा वाटपात झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच वडगाव शेरी मतदारसंघाबाबत आमच्यात काही चर्चा झाली नसल्याचे पत्रकारांशी बाेलताना नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान आमदारांच्या विराेधात इच्छुक उमेदवार जाहीरपणे भुमिका घेत आहेत. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ , सिद्धार्थ शिराेळे या पाचही आमदारांचा समावेश आहे. या पार्श्वभुमीवर बावनकुळे यांनी दाेन दिवस पुण्यात तळ ठाेकला. इच्छुकांशी त्यांनी चर्चा केली. काही सुचना केल्याचे समजते. पुणे शहरातील वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत. हा मतदारसंघ भाजपला दिला गेल्याची चर्चा रंगली आहे. तसेच माजी आमदार मुळीक यांनी देखील ) बावनकुळे यांची भेट घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, ‘‘वडगावशेरी मतदारसंघ भाजपकडे राहणार, अशी काय चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही, ही चर्चा माध्यमांमधूनच ऐकण्यात आली आहे.’’ कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागण्यात काहीही गैर नाही असेही त्यांनी नमूद केले. ‘‘ कोणी पक्षातील इच्छुक असेल तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेणे, त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे चुकीचे नाही. इच्छुकाला बंडखोर म्हणता येणार नाही. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संबंधीताने उमेदवारी अर्ज भरला तर त्याला बंडखोर म्हणावे लागेल. आम्ही समाज म्हणून नाही तर कतृत्व पाहून उमेदवारी देणार आहोत,’’ असे बावनकुळे यांनी सांगितले.