चिंचवड, :- शहरी मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन जनजागृती करावी तसेच मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा मतदासंघातील निवडणुक कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील बापूजी बुवा सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना अनिल पवार बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे,निवडणूक कार्यालयातील अधिकारी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्या दिवसापासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतात. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असणार आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतर मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पोलीस प्रशासनासोबत बैठक
२०५ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासह विविध यंत्रणांनी समन्वय ठेऊन कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी आढावा घेतला.
थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील बापूजी बुवा सभागृहामध्ये झालेल्या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे, निवडणूक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, नीता गायकवाड, दीपक गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षासोबत बैठक संपन्न
निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
२०५ चिंचवड विधानसभा मतदासंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रीयेसंबंधित माहिती देण्यासाठी थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील बापूजी बुवा सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली, यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे,निवडणूक कार्यालयातील अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.