आषाढी यात्रा सुरू असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या दर्शनरांगेतील भाविकांना मंदिर समिती मार्फत शुध्द पिण्याचे पाणी, चहा व खिचडी वाटप करण्यात येत आहे. खिचडी वाटपाचा शुभारंभ मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या पदस्पर्शदर्शनरांगेत सारडा भवन येथे खिचडी वाटप करण्यात येत आहे. यामध्ये भाविकांना गोड बुंदी, खारी बुंदी, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अनुभवी कर्मचारी श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून, खिचडी तयार करून वाटपासाठी श्री. संत गजानन महाराज मठ, अकोला या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे. दर्शनरांगेत दिनांक 13 ते 21 जुलै पर्यंत 24 तास मोफत खिचडी वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, दासोह रत्न चक्रवती दानेश्वर महाराज श्री. बसवगोपाल नीलमाणिकमठ बंडिगणीमठ, बागलकोट या स्वयंसेवी संस्थेमार्फत पत्राशेड येथे 24 तास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगेतच श्रींचा प्रसाद मिळत असल्याने भाविक समाधान व्यक्त करीत आहेत.