21.8 C
New Delhi
Friday, November 7, 2025
HomeTop Five Newsयुवा कौशल्यांची नवी दिशा!

युवा कौशल्यांची नवी दिशा!

कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार - संरक्षण मंत्री

महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – : आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले.

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब. मुजुमदार, प्र-कुलगुरु डॉ. स्वाती मुजुमदार, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सिंम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे नमूद करून संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले, आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दीष्ट असायला हवे.

नवभारताकडे देश जात असताना स्कील इंडीया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडियावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाने या क्षेत्रातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनशिक्षा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखापेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. यामुळे देशात कौशल्य विकासाला अनुकुल वातावरण तयार झाले आहे.

देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे श्री.सिंग म्हणाले.

स्नातकांना दीक्षांत संदेश देतांना ते म्हणाले, पदवी प्राप्त करून विद्यापीठाच्या बाहेर पडणाऱ्या स्नातकांसाठी संपूर्ण विश्व आता एक नव्या विद्यापीठाप्रमाणे असेल. या स्नातकांनी भविष्यातील चिंता न करता व्यापक दृष्टीकोन बाळगावा. संकुचित विचारांनी जीवनात सुख आणि आनंद मिळविता येत नाही. स्नातकांचे यश हे समाजाचा सहयोग, संस्कार आणि पाठिंब्याचा परिणाम आहे. त्यामुळे या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे आहे. कुशल बुद्धीच्या आधारे सतत कार्यरत राहून कौशल्य, संकल्प आणि परिश्रमाने स्नातक नव्या युगाची पायाभरणी करतील, असा विश्वास श्री.सिंग यांनी व्यक्त केली.

ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक होते. देशाच्या लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला. संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये भारतीय युवांनी मोठा पुढाकार घेतला असून गेल्या १० वर्षात आपली संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यातही सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे. २०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

भारताने नेहमीच ‘वसुधैव कुटुंबकम्’असा संदेश आपल्या कृतीतून दिला. देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करीत असताना सिम्बायोसिससारख्या संस्थांमध्ये सुरू करण्यात आलेल्या संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम शिक्षणासोबत देश उभारणीचा संकल्प आहे. नव्या युगातील संरक्षण उपकरण इथले स्नातक तयार करतील, असेही संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले.

महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन देशात एक कौशल्य विकासाचे अभियान सुरू केल्यावर सिम्बायोसिसने कौशल्य विद्यापीठाची कल्पना समोर आणली. देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरीत करण्याची गरज आहे. मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या मर्यादित आहे. सिम्बायोसिसने शिक्षणासोबत मूल्यांवर भर दिला असल्याने या क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. युवकांच्या आशा-आकांक्षाना बळ देणारी व्यवस्था विद्यापीठात उभी केली. विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरले आहे. यामागे विद्यापीठाचे परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे. येत्या दोन ते तीन वर्षात जगातील अग्रगण्य कौशल्य विकास विद्यापीठात सिम्बायोसिसची गणना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्याने पुढे जात असताना महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात या क्षेत्रातील गुंतवणुक, उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती राज्यात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्नातकांनी आपल्यासाठी शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या करणाऱ्या समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही श्री.फडणवीस यांनी केले.

कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, देशाला रोजगारक्षम कुशल युवकांची आवश्यकता आहे. देशातील तरुणाईला देशाच्या विकासाशी जोडण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यासाठी कौशल्य विकास शिक्षणाला चालना देण्याची गरज आहे. स्नातकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ रोजगाराचा विचार न करता जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करावा, शिक्षणासोबत मूल्यांची जपणूक करावी. विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून अभिमान बाळगताना धैर्याने आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्र. कुलगुरू डॉ. मुजुमदार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. राज्यातील कौशल्य विकासाचे हे पहिले विद्यापीठ असून गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाला नॅशनल युनिव्हर्सिटी रँकींग फ्रेमवर्कचे पहिले मानांकन मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभात १ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २ विद्यार्थ्यांना कुलपती यांचे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच २ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार आणि एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले. संरक्षण मंत्री श्री.सिंह आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौशल्य प्रशिक्षण उत्कृष्टता केंद्राला भेट देऊन विविध उद्योगांकडून कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रायोजित गरजू विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
21.8 ° C
21.8 °
21.8 °
14 %
2.7kmh
0 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!