..
.
प्रदेशाध्यक्षपदी राजकुमार कसबे तर युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी लक्ष्मण मोरे यांची निवड..
(पुणे)-
शेतकरी चळवळीची नवी क्रांती निर्माण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची नव्याने स्थापना केली आहे. या संघटनेच्या प्रमुख शिलेदारांची अर्थात पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली असून पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या. या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा लातूर जिल्ह्यातील राजकुमार कसबे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणीची बैठक पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आज 03 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. अगदी गडचिरोली, भंडारा, नागपूर पासून ते सोलापूर, कोल्हापूर,धुळे, ठाणे पर्यंतच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी, शिलेदार या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ही पहिलीच बैठक असल्याने राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला त्यामुळे ही बैठक हाऊसफुल्ल आणि धडाकेबाज ठरली. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही महाराष्ट्रात शेतकरी चळवळीची नवी क्रांती घडविण्यासाठी निर्माण केली आहे. सध्या चळवळी क्षीण होत आहेत, संघटना विखुरल्या आहेत, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा न्याय – हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर पुन्हा एकदा पेटून उठण्याची गरज आहे. शेतकरी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण आता महाराष्ट्रभर फिरून मोठे संघटन उभे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांनी एकत्र येत राज्यात नवी क्रांती आपल्याला निर्माण करायचे आहे त्यासाठी मी स्वतः राज्यभर फिरून प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घेणार आहे असे देखील यावेळी तुपकरांनी सांगितले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अगदी प्रामाणिकपणे चळवळीचे काम करावे, सोशल मीडियाचा योग्य वापर करून चळवळीला आणि शेतकरी विचारांना मजबूत करा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जोमाने लढायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी उद्यापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना करत सर्वे करून उमेदवार ठरविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यापुढे आपल्या चळवळीचे मुख्य केंद्र पुणे राहणार आहे , त्यासाठीच संघटनेची पहिली बैठक पुण्यात घेतली असल्याचे तुपकर यांनी सांगितले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जशी इंग्रजांच्या काळात पत्री सरकारची स्थापना केली होती त्याच धर्तीवर मुजोरांना धडा शिकवण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून “किसान आर्मी” तयार करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी रविकांत तुपकर यांनी जाहीर केल्या. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजकुमार कसबे (लातूर) यांच्या नावाचे रविकांत तुपकर यांनी घोषणा करताच सर्वांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केले. तर युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी लक्ष्मण मोरे (नांदेड), युवती आघाडीचे अध्यक्षपदी ऍड अश्विनी मेहत्रे(मुंबई ), व्यापारी आघाडीचे राज्य सल्लागार पदी सागर मंत्री (पुणे )तसेच विदर्भ प्रमुखपदी वर्ध्याचे किरण ठाकरे, मराठवाडा विभाग प्रमुखपदी हिंगोलीचे गजानन कावरखे, उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी ईश्वर पाटील, धुळे तर पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदी पुणे येथील ऍड आदित्य आरेकर(पुणे ) तसेच पूर्व विदर्भ प्रमुख पदी सागर दुधाने(नागपूर )यांची नियुक्ती यावेळी रविकांत तुपकर यांनी जाहीर करून या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी काही जिल्हाध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर गवळी, बुलढाणा – डॉ ज्ञानेश्वर टाले, वाशिम – बालाजी मोरे, नांदेड- बाळासाहेब जाधव, हिंगोली -नामदेव पतंगे, परभणी – भगवानराव शिंदे, लातूर – अरुण कुलकर्णी, लातूरच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रज्योत हुडे, सोलापूर युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी अमर इंगळे, नांदेड युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी अंगद पाटील आदींची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आली.
