पुणे : शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती, रांका ज्वेलर्सचे संचालक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व ओमप्रकाश नगराज रांका (वय ७१) यांचे गुरुवारी (२ एप्रिल) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणेतील व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
ओमप्रकाश रांका यांच्या पश्चात मुलगा वास्तुपाल, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सराफ व्यावसायिक फतेचंद रांका यांचे कनिष्ठ बंधू होते.
पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यवसाय असलेल्या रांका ज्वेलर्सच्या विस्तारात ओमप्रकाश रांका यांचा मोठा वाटा होता. शालेय शिक्षणानंतर त्यांनी रविवार पेठेतील पेढीतून व्यवसायाची सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या कष्ट व दूरदृष्टीच्या जोरावर व्यवसायाचा मोठा विस्तार साधला.
व्यवसायासोबतच त्यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यासह विविध भागांतील अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांशी ते जोडलेले होते. ‘जीतो’ (JITO) पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
धार्मिक कार्यात त्यांनी राजस्थानमधील नाकोडा येथे भव्य धर्मशाळा उभारली. तसेच अनेक मंदिरांच्या उभारणीतही त्यांचे योगदान राहिले आहे. भोसरी येथील गौशाळेच्या उभारणीत आणि विकासात त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. गरजू आणि सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असत.
त्यांच्या निधनाने पुणे शहराने एक कर्तृत्ववान उद्योजक आणि उदार मनाचा समाजसेवक गमावला असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.


