पुणे, -“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो नि:पक्षपाती असायला हवा. तसे झाले तरच त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी होईल. कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करून पत्रकारांना अधिक चांगले काम करता येईल. यामुळे पत्रकार अधिक समृद्ध व प्रभावी होईल,” अशी आशा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली.
मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पहिली ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकॅथाॅन’ आयोजित केली होती. या सोहळ्याच्या समारोपात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, रुपेरी किनार फाउंडेशनच्या संस्थापक व लेखिका कल्पना जावडेकर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते. दैनिक पुढारीच्या संपादक स्मिता जाधव, दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, दैनिक लोकमतचे सहयोगी संपादक यदु जोशी, न्युज १८ लोकमतचे वृत्तनिवेदक विलास बडे, इ-एज्युटेकचे निलेश खेडेकर यांना संपादक व्रतस्त सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, “महाराष्ट्र म्हणजे लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई या सर्व योद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. कितीही सुखसुविधा आल्या, तरी पत्रकारितेतला खरेपणा जाता कामा नये. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे तुमच्याच हातात आहे. पत्रकारांनी नेहमी निःपक्षपाती असायला हवे. पत्रकार निःपक्षपाती झाला, तर देशाचा नक्की विकास होईल. पत्रकाराचे काम बातमीतून माहिती देणे आहे, बातमी संपादित करणे नाही. मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्या बद्दल मोदींचे आभार मानले पाहिजेत.”
‘एआय’ भारताला सुपरपावर बनवेल: जाधव
डॉ. योगेश जाधव म्हणाले, “गेल्या दोन वर्षांत ‘एआय’ सामान्य माणसाच्या कक्षेत अगदी सुलभ दरात आले आहे. हे जितके फायदेशीर, तितकेच ते घातकही आहे. येणाऱ्या काळात ‘एआय’ गेमचेंजर ठरणार आहे. पत्रकारांसाठी खऱ्या-खोट्याची पडताळणी करणे अधिक अवघड झाले आहे. वेगवान आणि खरी बातमी या दोन्हींचा समतोल राखण्याची गरज निर्माण झाली आहे. या ‘एआय’मुळे आपण आपली क्षमता गमावता कामा नये.”
प्रास्ताविकात किरण जोशी म्हणाले, “अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून २५० प्रकल्प सादर झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी बातमीदार यापुढे प्रयत्न करतील.” कल्पना जावडेकर यांनी ‘रुपेरी किनार म्हणजे माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आहे’ असे नमूद केले. विजय बाविस्कर यांनीही मार्गदर्शन केले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.