सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
पुणे, -: दौंड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ५०० हून अधिक लाभपत्राचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, बोरीपार्धी, चौफुला येथे वितरण करण्यात आले. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले.
राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती
(२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा दौंड येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी सेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील गाव रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार प्राथमिक टप्प्यात एकूण १६ गावांच्या भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित नकाशाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी भटक्या व विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले ५०, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना लाभार्थी प्रमाणपत्रे १२५, भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमी दाखले १३४ गट , पुनर्वसन भूखंड वाटप २६, शिधापत्रिका वाटप ३२, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत वितरण दाखले ४ या प्रमाणे लाभपत्राचे वितरण करण्यात आले, असे तहसीलदार अरूण शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये कळविले आहे.