पिंपरी, -राज्यातील विधानसभा निवडणुकांचा सुरू असलेला रणसंग्राम, त्यात होणारे बेछूट आरोप – प्रत्यारोप, त्यामुळे तापलेले वातावरण, वर्षानुवर्षांचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण… सगळं काही बाजूला ठेवून राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बुधवारी (दि.३०) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला. राजकारणात एकमेकांचे विरोधक तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीचे हास्यविनोदी वातावरण व धमाल किश्श्यांमुळे जवळपास चार तास गप्पांची मैफल रंगली.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने यंदा आठव्या वर्षी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅलीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शहराध्यक्ष शंकर जगताप, सचिन चिखले, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, राहुल कलाटे, योगेश बाबर, सचिन साठे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, सुरेश भोईर, धनंजय काळभोर, तुषार हिंगे, बाळासाहेब मोरे, संतोष कांबळे, महेश कुलकर्णी, अमित बाबर, विशाल यादव, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, इंद्रायणी बँकेचे संस्थापक ॲड. एस. बी. चांडक, उपायुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, शरीरसौष्ठव संघटनेचे राजेंद्र नांगरे, मनोज जरे, कलोपासकचे प्रदीप पाटसकर, अभिनेते नितीन धंदुके, ॲड. राजेश जाधव, प्रचिती जाहिरात संस्थेचे प्रशांत पाटील, सम्यक साबळे आदींनी हजेरी लावली.
दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष गोरख भालेकर, जगन्नाथ शिवले, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, खजिनदार नंदकुमार कांबळे आदींसह दिशा सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी संयोजन केले.