टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर सांगलीच्या स्मृती मंधानाच्या कुटुंबाला विशेष भेट
सांगली : “बाबा… तुमच्या लेकीने आणि तिच्या सहकाऱ्यांनी इतिहास घडवला! आज केवळ सांगलीच नाही, तर संपूर्ण भारत तुमच्यावर अभिमान बाळगतो,” अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी आज स्मृती मंधानाच्या सांगली येथील निवासस्थानी भेट देत तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान पालकमंत्री पाटील म्हणाले, “स्मृती मंधाना आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलेली कामगिरी ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. ह्या मुलींच्या पराक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना प्रेरणा मिळेल. त्या स्वप्न पाहतील, मेहनत करतील आणि देशाचे नाव अधिक उंचावतील.

सांगलीकरांच्या लेकीने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण जिल्हा उत्साहात असून, स्मृती मंधानाच्या घरी अभिनंदनाचा ओघ सुरू आहे. तिच्या खेळातील चिकाटी, सातत्य आणि संघभावनेमुळे ती आज प्रत्येक तरुणीची प्रेरणा बनली आहे.


