पुणे : ब्राह्मण ही जात नाही तर संस्कृती आहे. चारित्र्यसंपन्नता हा ब्राह्णणांचा सगळ्यात मोठा गुण आहे, परंतु मागील शंभर वर्षात ब्राह्मण समाजाला आत्मविस्मृती आली आहे. याचे सगळ्यांत मोठे कारण म्हणजे गांधी हत्येनंतरचा संहार. त्यानंतर भय आणि नैराश्याने हा समाज पछाडला. ब्राह्मण समाज विखुरला गेला आणि एकत्र येण्याची प्रक्रिया खूप उशिरा सुरू झाली. मुला मुलींना शिकवा आणि परदेशी पाठवा हेच धोरण अवलंबिले गेले. फुले, शाहू,आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे म्हटले जाते, परंतु टिळक, सावरकर, चिपळूणकर यांचा महाराष्ट्र म्हटले जात नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उदघाटन स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, साहित्य संमेलनाध्यक्षा कृष्णी वाळके, अजय कारेकर, कुमार अणवेकर, उदय गडकरी, मनमोहन चोणकर, सूर्यकांत कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी संदीप गजानन पावसकर यांना गडकरी प्रतिष्ठानच्या पुरस्काराने तर चंद्रशेखर दाभोळकर यांचा नाथ माधव साहित्यिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.राहुल सोलापूरकर म्हणाले, ज्ञान संवर्धनात मोठेपणा मानणारा ब्राह्मण समाज आहे. ब्राह्मण समाजाने इतर समाजाच्या उत्थानासाठी काम केले. सगळ्या समाजाला एका स्तरावर आणून समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्याचे सर्वाधिक काम ब्राह्णणांनी केले, हे विस्मृतीत जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विश्वात्मक एकात्मता आणि संस्कृती च्या सगळ्या अंगाला समृद्ध करण्याचे काम ब्राह्मण समाजांना केले. आपापल्या क्षेत्रात दैवज्ञ आणि इतर ब्राह्मण समाजाने उंची गाठली आहे. समाजाचा इतिहास मोठा आहे, पण ते पुढच्या पिढीकडे सोपविणे देखील तितकेच महत्वाचे आहे, तरच समाज मोठा होतो. डॉ. गजानन रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले.