32.1 C
New Delhi
Wednesday, April 1, 2026
HomeTop Five News३० एप्रिलपूर्वी पावसाळी कामे पूर्ण करा

३० एप्रिलपूर्वी पावसाळी कामे पूर्ण करा

महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.महापौरांनी याबाबतचे सविस्तर पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले असून लवकरच यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांवर भर

पत्रात नमूद केल्यानुसार, शहरातील सर्व नालेसफाई आणि पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची स्वच्छता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावी. या कामांची दैनंदिन नोंद संबंधित क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ठेवून त्याचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टीचा अनुभव लक्षात घेता, नदीकाठच्या वस्त्या आणि पूरप्रवण भागांमध्ये विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘हॉटस्पॉट्स’ यादी अद्ययावत करण्याचे आदेश

पूरप्रवण भागांची ‘हॉटस्पॉट्स’ यादी अद्ययावत करून अशा ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पंपिंग मशिनरीसह अन्य आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापौर स्वतः या भागांची पाहणी करणार असून संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल तीन दिवसांत

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तीन दिवसांच्या आत महापौर कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रस्ते दुरुस्ती आणि नवीन खोदकामावर नियंत्रण

पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन अपघात होऊ नयेत यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची अंतिम तारीख निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, असेही महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.

महापौरांच्या या आदेशामुळे पावसाळ्यापूर्व तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने या कामांना प्राधान्य देत शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
32.1 ° C
32.1 °
32.1 °
29 %
1.5kmh
40 %
Wed
35 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
31 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments