21.1 C
New Delhi
Saturday, April 4, 2026
HomeTop Five Newsमुलुंडमध्ये मेट्रो बांधकाम दरम्यान स्लॅब कोसळला

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकाम दरम्यान स्लॅब कोसळला

एकाचा मृत्यू, तिघे जखमी – वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई: मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर मेट्रो-४ मार्गिकेच्या बांधकामादरम्यान शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मेट्रो पुलाच्या पॅरापेटचा (स्लॅब) मोठा भाग उंचावरून खाली जात असलेल्या रिक्षा आणि कारवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२:२० वाजण्याच्या सुमारास मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मिलन परिसरात पियर क्रमांक पी-१९६ जवळ बांधकाम सुरू होते. ऐन वर्दळीच्या वेळी सिमेंटचा मोठा तुकडा अचानक कोसळल्याने रिक्षेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, मेट्रो प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

या दुर्घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सामाजिक माध्यमावरून प्रतिक्रिया देताना, “सामान्य नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ दिखावूपणावर भर दिला जात आहे का?” असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत, “मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? केवळ पायाभूत सुविधांची जाहिरात करण्यापेक्षा सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे,” असे म्हटले आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी पुरेसे बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती. वर्दळीच्या रस्त्यावर अवजड बांधकाम सुरू असताना योग्य खबरदारी घेतली गेली नसल्याचा आरोप केला जात आहे. सध्या पोलीस आणि प्रशासन या दुर्घटनेची तांत्रिक कारणे शोधत असून संबंधित जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मुंबईतील सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
83 %
2.1kmh
75 %
Sat
31 °
Sun
32 °
Mon
34 °
Tue
35 °
Wed
29 °

Most Popular

Recent Comments