सोलापूर, : महाराष्ट्रातील बिडी उद्योगात काम करणाऱ्या महिला बिडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय सर्वसमावेशक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे. यामुळे गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किमान वेतनाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची आशा कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी सांगितले की, अनेक बैठका आयोजित होऊनही मालक प्रतिनिधी हजर राहत नाहीत. त्यामुळे सरकारचा धाक बिडी उद्योजकांवर नाही, असे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे किमान वेतनाच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
१६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिव, कामगार आयुक्त, अप्पर आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात उच्चस्तरीय सर्वसमावेशक बैठक घेण्याचे जाहीर करण्यात आले.
या बैठकीसाठी महाराष्ट्र कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार सेना, कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, मालक वर्ग पुन्हा अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
English TiTle – High-Level Inclusive Meeting to Ensure Minimum Wages for Beedi Workers; Questions Raised on Government’s Control Over Employers