Sindoor Yatra मुंबई, – : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता देशभरात देशभक्तीचा जाज्वल्य उत्सव पाहायला मिळणार आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चातर्फे ‘सिंदूर यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. “हे केवळ ऑपरेशन नव्हते, तर भारतीय स्त्रीच्या अस्तित्वासाठी लढलेली एक लढाई होती,” असे त्या म्हणाल्या.चित्रा वाघ यांनी सांगितले की, “भारतीय महिलांच्या कपाळावरचा सिंदूर जेव्हा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने पुसला गेला, तेव्हा ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय जवानांनी न्याय दिला. कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनबाबत जागतिक स्तरावर जी माहिती मांडली, ती पाकिस्तानच्या मर्मावर आघात करणारी ठरली,” असे त्या म्हणाल्या.
या ऐतिहासिक ऑपरेशनमध्ये महिलांनी दाखवलेले नेतृत्व आणि सहभाग हा नवभारताच्या लष्करी ताकदीचा नवा चेहरा बनला आहे. त्यामुळे यंदा संपूर्ण देशभरात भाजप महिला मोर्चा सिंदूर यात्रा काढणार आहे.
📍 जिल्हानिहाय आयोजन, सर्व महिलांचा सहभाग
“२१ मे रोजी नांदेड येथे सिंदूर यात्रा होणार असून मी स्वतः उपस्थित राहणार आहे. पुढील बुधवार किंवा गुरुवारी मुंबईतही सिंदूर यात्रा आयोजित होणार आहे. केवळ भाजपच्याच नव्हे, तर सर्व स्तरातील महिला यामध्ये सहभागी होतील,” असे वाघ यांनी स्पष्ट केले.
या यात्रेद्वारे भारतीय सैनिकांना वंदन, त्यांचं सामर्थ्य जनतेपर्यंत पोहोचवणं आणि महिलांच्या सहभागातून देशभक्तीचं सशक्त दर्शन घडवणं हा उद्देश आहे.