पिंपरी, – : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रसारमाध्यमांतून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षा तथा महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक प्रचार समाप्तीबाबत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ही वेळ निश्चित केली आहे. प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवार, राजकीय पक्ष किंवा अन्य व्यक्तीकडून इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच डिजिटल माध्यमांतून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
तर समितीचे सदस्य सचिव किरण गायकवाड यांनी सांगितले की, जाहीर प्रचार समाप्तीनंतर प्रसारमाध्यमांतील जाहिरातींच्या पूर्वप्रमाणनाचा अथवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर तरतुदी राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. सर्व उमेदवार, राजकीय पक्ष तसेच प्रसारमाध्यमांनी या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन समितीच्या वतीने किरण गायकवाड यांनी केले आहे.


