मुंबई : राज्यात झालेल्या सातत्यपूर्ण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. नुकसानीची संपूर्ण आकडेवारी पुढील २–३ दिवसांत उपलब्ध होईल आणि त्यानंतर व्यापक मदत धोरण जाहीर केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले –
- ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे.
- ई-केवायसीची अट शिथिल करून अॅग्रीस्ट्रकच्या रेकॉर्डप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- काही ठिकाणी पूरस्थिती कायम असल्यामुळे अंतिम मूल्यांकनाला थोडा वेळ दिला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खरडून गेलेली जमीन, विहिरी, घरे, तातडीची मदत यासह सर्व बाबींचा विचार करून एक व्यापक मदत धोरण पुढील आठवड्यात जाहीर केले जाईल.
“ही संपूर्ण मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.