मुंबई – देशभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या “इंडियन आयडॉल” या लोकप्रिय रियालिटी शोच्या 15व्या पर्वाचा भव्य समारोप झाला आणि कोलकाताहून आलेली मानसी घोष हिने या प्रतिष्ठित विजेतेपदावर आपले नाव कोरले.

श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आवाजामुळे आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे मानसीने संपूर्ण सीझनभर आपली छाप सोडली. अंतिम फेरीत ती शुभजीत चक्रवर्ती, स्नेहा शंकर, चैतन्य देवाढे (माऊली), प्रियांग्शु दत्ता आणि अनिरुद्ध सुस्वरम यांच्यासह सहभागी होती.
सुत्रसंचालन आदित्य नारायणने तर परीक्षक मंडळी – बादशाह, विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल – यांनी स्पर्धकांचे मार्गदर्शन आणि उत्साहवर्धन करत संपूर्ण कार्यक्रमात रंग भरले.
मानसीच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचे आणि मेंटर्सचे भक्कम पाठबळ असल्याचे तिने मान्य केले. “ही केवळ सुरुवात आहे,” असे ती नम्रतेने म्हणाली. “माझ्या गुरूजनांकडून मला जो मार्गदर्शन लाभले, त्यामुळेच मी हे स्वप्न पूर्ण करू शकले.”
परीक्षक श्रेया घोषाल म्हणाल्या, “मानसीचं गायन मनापासून होतं. ती गाण्यात भाव ओतायची. तिचं हे यश म्हणजे एका तेजस्वी प्रवासाची सुरुवात आहे.”
विशाल ददलानी यांनीही तिच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले: “मानसी ही इंडियन आयडॉलच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती आहे. तिच्या आवाजात अशी काही जादू होती, जी थेट हृदयाला भिडायची.”
ग्रँड फिनालेमध्ये रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, मिका सिंग यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी आणि ‘चमक’ या वेबशोच्या कलाकारांनी विशेष हजेरी लावून शोची शोभा वाढवली.
मानसी घोषच्या यशाने केवळ तिचेच नाही, तर इंडियन आयडॉलच्या गौरवशाली प्रवासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे.