*मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची
पंढरपूर :- आजचे जग ज्ञानावर सुरु आहे .विकास हा ज्ञानातून होतो. ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे. जग हे संशोधनावर श्रीमंत झाले आहे. ज्ञान नसेल तर तंत्रज्ञानात पुढे जाता येणार नाही, जगात पुढे जायचे असेल तर नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या संस्थेच्या स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत, विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण तसेच मुलींचे नऊ मजली नूतन वस्तीगृह पायाभरणी सोहळा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, सचिव सूरज रोंगे, डॉ.अनिकेत देशमुख, जि. प माजी सदस्य वसंतनाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातले सवोर्त्तम ज्ञान भारतात होते. नालंदा, तक्षशिला जगातील पहिली विद्यापीठे होती. आपल्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची पूर्तता करायची असेल तर सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणसंस्थातून निर्मित होणे गरजेचे आहे. तसेच नाविन्यपूर्ण संशोधनासाठी शिक्षणसंस्थेबरोबर शासन राहिल.राज्यात ८४२ कोर्सेस ना मुलींना फी माफ केलेली आहे. मुलींच्या वसतीगृहाशिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही. सुरक्षित वसतीगृहे आवश्यक आहे, मुलींच्या वस्ती गृहाला पर्याय नाही. कमवा व शिका या योजनेतेर्गत राज्यातील 5 लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे उद्दिष्ट आहे. यावर शासन काम करत आहे. मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्या खुप शिकतील असे ही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले
यावेळी उद्दीष्टपुर्ती करण्यासाठी माणसाला ध्येय लागते. रोंगे सरांनी मेहनत घेवून स्वेरी संस्था नावारुपाला आणली असे गौरोवद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांनी केले.
मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देणे ही भूमिका शासनाची – पालकमंत्री जयकुमार गोरे
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुलींना शिक्षणामध्ये कुठल्या अडचणी येऊ नये त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका शासनाची आहे. मराठा समाजातील मुला- मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षणातल्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला .तसेच चांगल्या शिक्षणाबरोबर निवासाची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुला मुलींसाठी वसतीगृहाची व्यवस्था करण्यात येत आहे.
देशाची पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलें शिक्षण आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी स्वेरी ने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. स्वेरीमुळे गोर गरिबांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल,असेही पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात स्वेरी संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी रोगे म्हणाले, सन 1998-99 पहिलंच वर्ष त्यावर्षी या महाविद्यालयाची रूपाली पवार या विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवून पहिली आली होती.ती परंपरा अद्याप चालू आहे स्वेरी संस्थेची विद्यार्थी संख्या 160 वरून 5500 विद्यार्थी संख्या, तर 8 शिक्षकावरुन 330 शिक्षक संख्या झाली. संस्थेचे प्लेसमेंटच्या माध्यमातून 500 हून अधिक विद्यार्थी नोकरीला लागले आहेत. विकसित देशात संस्थेचे विद्यार्थी नोकरी करीत आहेत. प्रवेश आणि कॅम्पस एवढेच नाही तर संशोधन करण्यालाही प्राधान्य दिलेले आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांनी 33 कोटी 73 लाख रुपये चा दोन वर्षाच्या रिसर्च प्रोजेक्ट मंजूर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.