28.1 C
New Delhi
Monday, October 20, 2025
HomeTop Five News'फुलवरा’ रंगवणार तमाशाचा नवा अध्याय!

‘फुलवरा’ रंगवणार तमाशाचा नवा अध्याय!

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधव यांनी तर झी टॉकीजची (आताचं झी स्टुडिओज) ही पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत एक नवा कोरा तमाशापट घेऊन ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर समाजमाध्यमावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल कमालीचं उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात की,” तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावरच आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. याचदरम्यान मी ‘द फोक आख्यान’ हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला , परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे. त्यांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच फुलवरा चित्रपटाची गोष्ट तयार झाली. ‘द फोक आख्यान’ ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास थक्क करणारा आहे आणि हर्ष – विजय या तरुण जोडगोळीला असलेली लोकसंगीताची जाण ही कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलवराची गोष्ट तयार झाली. अशा प्रकारची गोष्ट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी झी स्टुडिओजपेक्षा उत्तम असं दुसरं माध्यम नाही त्यामुळे नटरंग नंतर पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो आहोत. दिवाळी हा सण आपली परंपरा साजरा करणारा आहे त्यामुळेच या दिवाळी सणात लोकपरंपरा जपणाऱ्या आणि ती साजरी करणाऱ्या या चित्रपटाची घोषणा आम्ही केली आहे.”

फुलवराच्या या घोषणेबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की,”नटरंग हा चित्रपट केवळ झी समुहासाठीच नाही तर अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठीचं सुर्वण पान आहे. नटरंग हा एक मैलाचा दगड आहे. आजही या चित्रपटाचं आणि त्याच्या संगीताचं भारूड प्रेक्षकांच्या मनावर आहे. आजच्या तरुण पिढीचा लोक संगीताकडे असलेला कल, यात झालेले बदल या सर्वांची गोष्ट मांडणाऱ्या फुलवरा चित्रपटाची गोष्ट रवी जाधव यांनी जेव्हा ऐकवली तेव्हाच हा चित्रपट करणं ही आजच्या लोककलेसाठीची खरी गरज आहे अशी भावना मनात आली. आज समाजमाध्यमांचा आपल्यावर असलेला प्रभाव, सोबतीला मनोरंजनाचे असलेले अनेक पर्याय यातही लोकसंगीताने आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे आणि यासाठी कारणीभूत आहे ते या कलाप्रकाराकडे नव्या दृष्टीने पाहणारी तरुण लोककलावंतांची पिढी. ‘द फोक आख्यान’सारख्या लोकसंगीताला वाहिलेल्या कार्यक्रमामधून सर्वच तरुण कलावंतांची तळमळ ही आपण सर्वच अनुभवत आहोत. त्यामुळेच या नव्या पिढीसोबत अनुभवी दिग्दर्शक रवी जाधव यांनी गोष्ट सादर करणं ही कल्पनाच खूप रंजक आहे. मराठी चित्रपटसृष्टीत होणाऱ्या अशा नवनव्या प्रयोगाला झी स्टुडिओज कायमच प्रोत्साहन देतं आणि त्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाद्वारे लोककलेचं आणि लोकसंगीताचं एक नवं आणि अनोखं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येईल आणि नटरंगप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या काळजात घर करेल असा विश्वास आम्हाला आहे.”

‘फुलवरा’ चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात असून याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
51 %
1.5kmh
20 %
Mon
30 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!