मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी (दि. 15 डिसेंबर) मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार –
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे ते म्हणाले.
29 महापालिकांत 2869 जागा –
आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणूक खर्चाची मर्यादा –
महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. अ वर्ग – 15 लाख, ब वर्ग – 13 लाख, क वर्ग – 11 लाख, ड वर्ग – 9 लाख.
मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे. मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील.
राज्यातील 1,96, 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल. राज्यातील 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह –
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
– सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार,
– 3 कोटी 48 लाख मतदार
– मतदार यादी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार.
– मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्र
– संभाव्य दुबार मतदाराच्या नाववर *केलेला आहे.
– बृहन्मुंबई महापालिकेत 11 लाख दुबार मतदार
– 2869 जागेसाठी निवडणूक होणार
– एकूण मतदार केंद्र – 39,147
महत्वाच्या तारखा –
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी, 23 ते 30 डिसेंबर 2025
-छाननी – 31 डिसेंबर 2025,
-उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी 2026
-निवडणूक चिन्हा वाटप व अंतिम उमेदवाराची यादी 3 जानेवारी 2026
-मदतानाचा दिनांक 15 जानेवारी 2026
-मतमोजणी दिनांक – 16 जानेवारी 2026
हापालिकांमध्ये निवडणूक होणार –
1. बृहन्मुंबई – 227
2. भिवंडी-निजामपूर – 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे – 131
6. अहमदनगर – 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड – 128
9. औरंगाबाद – 113
10. वसई-विरार – 115
11. कल्याण-डोंबिवली – 122
12. नवी मुंबई – 111
13. अकोला – 80
14. अमरावती – 87
15. लातूर – 70
16. नांदेड-वाघाळा – 81
17. मीरा-भाईंदर – 96
18. उल्हासनगर – 78
19. चंद्रपूर – 66
20. धुळे – 74
21. जळगाव – 75
22. मालेगाव – 84
23. कोल्हापूर – 92
24. सांगली-मिरज-कुपवाड – 78
25. सोलापूर – 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना – 65
28. पनवेल – 78
29. परभणी – 65
निवडणुका 5 ते 7 वर्षांपासून प्रलंबित –
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका मागील 5 ते 7 वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.


