मुंबई, : राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये ‘वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत-नगरपालिका योजना’अंतर्गत प्रत्येक ठिकाणी एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या उद्यानांना ‘नमो उद्यान’ हे नाव देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या योजनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राकडून हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात उभारण्यात येणार आहेत.
या नव्या उद्यानांमध्ये विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यामधून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी, द्वितीय क्रमांकासाठी ३ कोटी, तर तृतीय क्रमांकासाठी १ कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी म्हणून देण्यात येणार आहेत.