पुणे : पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने महाराष्ट्राने एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन यशस्वीरीत्या पार पडली. ही ऐतिहासिक ट्रायल रन मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गावर घेण्यात आली.
ही चाचणी मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण), पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. या ट्रायलला अधिकाऱ्यांसह तज्ज्ञ आणि नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
हायड्रोजन इंधनावर चालणारी ही बस पूर्णपणे प्रदूषणमुक्त आहे. ती चालू असताना कार्बन डायऑक्साइडऐवजी फक्त पाण्याची वाफ उत्सर्जित करते. त्यामुळे वायूप्रदूषणात लक्षणीय घट होणार असून, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होईल.
राज्य शासनाने ग्रीन एनर्जीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही ट्रायल रन राबविली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारंपरिक इंधनांवरील (पेट्रोल आणि डिझेल) अवलंबित्व कमी होणार आहे. त्यामुळे इंधन आयातीवरील खर्चातही घट अपेक्षित आहे.
हायड्रोजन बस खरेदीसाठी राज्य शासन ३० टक्क्यांपर्यंत अनुदान (सबसिडी) देणार आहे. साधारण अडीच ते तीन कोटी रुपयांच्या घरात असणारी ही बस, अनुदानानंतर स्थानिक प्रशासनाला सुमारे दोन कोटी रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहर परिवहन व्यवस्था अधिक परवडणारी आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) हे या प्रयोगाचे केंद्र असून, यशस्वी ट्रायलनंतर पुढील काही महिन्यांत अधिक बस शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे पुणे आणि राज्यातील इतर महानगरांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतुकीत हायड्रोजन बसचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यास, हे देशासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते, असे मत ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


