मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या राजकीय लढतीत भाजपला पहिलं मोठं यश मिळालं आहे. दहिसर येथील प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या विजयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे, शिवसेनेनं त्यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर यांच्या जवळच्या मैत्रिणीला उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी पक्षांतरानंतरही तेजस्वी घोसाळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना स्पष्ट कौल दिला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच तेजस्वी घोसाळकर यांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीअखेर त्यांना 11,964 मते मिळाली होती, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार धनश्री कोलगे यांना केवळ 4,115 मते मिळाली होती. त्यानंतरही ही आघाडी कायम राहिली.
अखेरच्या निकालात तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण 16,484 मते मिळवत 10,755 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी धनश्री कोलगे यांना 5,729 मतांवर समाधान मानावे लागले.
या विजयामुळे मुंबई महापालिकेत भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा झाला असून, दहिसर परिसरात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. पक्षांतरानंतर लगेचच मिळालेल्या या यशामुळे तेजस्वी घोसाळकर यांची राजकीय ताकदही अधोरेखित झाली आहे.


