पिंपरी-चिंचवड -: भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची नेत्रदीपक प्रगती होत असून मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू आहे. या विकासप्रवासात शहरातील लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्षे शहराची सेवा करणाऱ्या विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांच्या माध्यमातून शहरविकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.
मुंबईमध्ये या वेळी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अजित पवार गटाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अजित पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, शरद पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक समीर मासुळकर, ठाकरे गटात कार्यरत असलेले भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अमित गावडे, महायुतीचे कार्यकर्ते व माजी अपक्ष नगरसेवक संजय काटे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीनल यादव, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आणि अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद नढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या जम्बो प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप अधिक बळकट होणार असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश करण्यात आले.


