पुणे- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी पुण्यातील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आणि सूचक संदेश दिला. ‘पक्ष असेल तरच सरकार असते, हा संदेश अटलजींनी दिला. त्यामुळे तिकीट मिळाले नाही तरी बंडखोरी करावीशी वाटत नाही,’ असे विधान करत तावडे यांनी अप्रत्यक्षपणे तिकीट वाटपावर भाष्य केले.
मोरया प्रकाशनातर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या ‘अटलजी व्रतस्थ याज्ञिक’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मोरया प्रकाशनाचे कौस्तुभ देव, डॉ. सुनील भंडगे आणि डॉ. शिरीष सहस्रबुद्धे उपस्थित होते.
अटलजींच्या नेतृत्वातून कार्यकर्त्यांना ऊर्जा- तावडे म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सव इतका भव्य होऊ शकतो, हे सुरुवातीला पटले नव्हते. पण पुणेकरांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. पुस्तके ही पुण्याच्या डीएनएमध्ये आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.’
साहित्य संमेलनांमध्ये पूर्वी कोट्यवधी रुपयांची पुस्तकविक्री व्हायची. वाचक आजही आहेत, गरज आहे ती पुस्तके त्यांच्या जवळ पोहोचवण्याची, असेही त्यांनी नमूद केले. ‘अटल बिहारी वाजपेयी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते कवी आणि साहित्यिकही होते. गीतरामायणाच्या कार्यक्रमात त्यांनी एकही राजकीय वाक्य वापरले नाही. मुंबईत आले की शिवाजी मंदिरात मराठी नाटक पाहणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम असे,’ असे सांगत तावडे यांनी अटलजींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अटलजींच्या नेतृत्वाचा दाखला देत तावडे म्हणाले, ‘आग्रा समिट अपयशी ठरली, पण “किसीने छेडा तो छोडेंगे नही” हे अटलजींनी कारगिलमध्ये दाखवून दिले. पक्ष महत्त्वाचा आहे, सरकार नंतर येते, ही भूमिका त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात ठसवली. त्यामुळे तिकीट न मिळालं तरी बंडखोरी करावीशी वाटत नाही. नेत्यांची सलगी कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा देते.


