पुणे : राजधानी नसतानाही देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीत पुण्याने गेल्या दशकात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, आगामी काळात पुणे देशातील आदर्श शहर म्हणून उदयास येईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विकासदृष्टीचा सविस्तर आढावा मांडला.
मोहोळ म्हणाले, देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असून, महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. या दोन्ही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या पूर्ततेत पुण्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून, महापालिकेच्या माध्यमातून शहराचा वेगाने कायापालट केला जाईल.
२०१४ नंतर केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर पुण्याच्या विकासाला नवे परिमाण मिळाले, असे नमूद करत मोहोळ म्हणाले की, अवघ्या अकरा वर्षांत पुण्याने विकासाची अनेक शिखरे गाठली आहेत. केंद्र सरकारकडून पुण्याला भरभरून सहकार्य मिळाले असून, पायाभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.
पुणे मेट्रो प्रकल्प हे याचे ठळक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. याच अनुषंगाने प्रत्येकी एक हजार इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस शहराच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत दाखल होत असून, त्यामुळे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवास शक्य होणार आहे.
मोहोळ यांनी पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचाही उल्लेख केला. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळाचा विस्तार झाला असून, त्यामुळे देशातील पहिल्या दहा महत्त्वाच्या विमानतळांमध्ये पुण्याचा समावेश झाला आहे. यामुळे उद्योग, आयटी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून २६ हजारांहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे घर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधांच्या बाबतीतही पुण्याने लक्षणीय प्रगती केल्याचे नमूद करताना मोहोळ म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांसाठी अटल बिहारी वाजपेयी रुग्णालय केंद्राच्या माध्यमातून आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महागड्या खासगी उपचारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे.
महापालिकेत गेल्या पाच वर्षांत भाजपाने केलेली विकासकामे पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली असल्याचा दावा करत मोहोळ म्हणाले, शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, उद्याने आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. त्यामुळेच पुणेकरांचा कौल प्रचारात स्पष्टपणे दिसत असून, पुन्हा एकदा भाजपालाच संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातील विकास आराखड्याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, पुढील पाच वर्षांत कात्रज, खडकवासला, खराडी, वाघोली, लोणी काळभोर, सासवडपर्यंत मेट्रो विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच पुणे विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. पुणे विमानतळाचा आणखी विस्तार, एम्ससारखे दर्जेदार रुग्णालय, भारत मंडपमच्या धर्तीवर भव्य कन्व्हेन्शन सेंटर, पुणे–मुंबई द्रुतगती मार्गाला समांतर नवा महामार्ग आणि जीसीसी–डेटा सेंटर हब उभारण्यासाठी आपण दिल्ली स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व विकास प्रकल्पांसाठी पुणेकर भाजपाला आशीर्वाद देतील आणि पुण्याला देशातील आदर्श शहर बनवण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त करत मोहोळ यांनी आपले मत मांडले.


