पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या सई थोपटे यांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सई थोपटे पुणे महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या असून, त्यांच्या यशाने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सई थोपटे सध्या पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस महाविद्यालयात बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचा वर्ग सुरू असतानाच त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणूक रिंगणात उतरून मिळवलेला हा विजय सई थोपटे यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
महाविद्यालयीन जीवनातच सई थोपटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय, कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. तरुणांच्या प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडत सातत्याने आवाज उठवला आहे. याच कामाची पावती मतदारांनी त्यांना दिल्याचे दिसत आहे.
राजकारणात सई थोपटे या नवख्या असल्या, तरी त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील प्रशांत थोपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून, पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि विधानसभा निवडणूक संयोजक अशी विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
पर्वती, सहकारनगर आणि धनकवडी परिसरात भाजप पक्ष पोहोचवण्यासाठी प्रशांत थोपटे यांनी सातत्याने काम केले आहे. थोपटे कुटुंबाची पक्षाशी असलेली निष्ठा आणि सई थोपटे यांची तरुणाईतील लोकप्रियता लक्षात घेऊन पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पुणे महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली होती.
या विजयामुळे पुणे शहराला सर्वात तरुण नगरसेविका मिळाली असून, स्थानिक प्रश्नांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


