सोलापूर, – सोलापूरकरांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूर विमानतळावरून थेट गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या नव्या विमानसेवेचा शुभारंभ झाला. पहिल्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आले, यामुळे सोलापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक आणि सुविधा
सोलापूर-गोवा विमानसेवा आठवड्यातून चार दिवस उपलब्ध राहणार आहे.
- सोमवार आणि शुक्रवार :
- गोव्यातून सकाळी ७.२० वाजता विमान सोलापूरसाठी उड्डाण घेईल आणि ८.३० वाजता सोलापूरमध्ये पोहोचेल.
- सोलापूरहून सकाळी ८.५० वाजता गोव्यासाठी विमान निघेल आणि १०.१५ वाजता गोवा विमानतळावर उतरेल.
- शनिवार आणि रविवार :
- गोव्यातून सायंकाळी ४.०५ वाजता सोलापूरसाठी विमान निघेल आणि ५.१० वाजता सोलापूरमध्ये पोहोचेल.
- सोलापूरहून सायंकाळी ५.३५ वाजता गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल आणि ६.५० वाजता गोव्यात उतरेल.
ही सेवा सुरू झाल्यामुळे सोलापूर आणि गोवा या दोन प्रमुख शहरांमधील ४०९ किलोमीटरचे अंतर केवळ दीड-दोन तासांत पार करता येणार आहे. विमान तिकीटाचा दर ३,५०० ते ५,००० रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
पर्यटन आणि व्यवसायाला चालना
सोलापूर-गोवा विमानसेवेच्या शुभारंभामुळे दोन्ही शहरांतील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने सोलापूरकरांना आता सहज, जलद आणि आरामदायक प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच गोव्यातील नागरिकांनाही सोलापूरमध्ये ये-जा करणे सोपे होणार आहे.
नव्या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या नव्या विमानसेवेचे उद्घाटन होताच सोलापूरकरांनी आनंद व्यक्त केला असून, लवकरच या मार्गावर प्रवास करण्यास उत्सुकता दर्शवली आहे. सोलापूर विमानतळावरही या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्याने संपूर्ण परिसरातील प्रवाशांना आणि पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे.
सोलापूरकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सोलापूर विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीच्या विमानाने थेट गोवा मार्गावर उड्डाण घेत, या शहराचा देशाच्या हवाई क्षेत्राशी थेट संपर्क प्रस्थापित झाला. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या विमानसेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
या वेळी बोलताना राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “सोलापूर हे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक, तेलंगणाच्या सीमावर्ती जिल्ह्यांसाठी केंद्रबिंदू आहे. आता हवाई सेवा सुरू झाल्याने या संपूर्ण भागाच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई विमानसेवाही सुरू होणार असून, तिरुपती, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठीही लवकरच हवाई सेवा उपलब्ध होईल.
विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, फ्लाय 91 चे सीईओ दिनेश चाको आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले की, “विमान कंपन्या नव्या शहरातून सेवा सुरू करण्यापूर्वी आर्थिक व्यवहार्यता तपासतात. सोलापूरच्या नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज ही सेवा प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून गोवा मार्ग सुरू झाला असून, मुंबईसाठीची सेवा देखील लवकरच सुरू होईल.”
सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग आणि वातावरण स्पष्टता वाढवण्यासाठी डीवॉल सिस्टीम बसवण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या हवाई सेवेचा सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आजच्या शुभारंभाच्या विमानात प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आले. तसेच, गोव्यातून आलेल्या प्रवाशांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
फ्लाय 91 ची ही सेवा आठवड्यातून चार दिवस उपलब्ध राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन, वृक्षारोपण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला.
सोलापूर विमानसेवेच्या शुभारंभामुळे आता या भागाचा देशभरातील प्रमुख शहरांशी दळणवळण अधिक सुलभ होणार असून, आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला नवा वेग मिळणार आहे.