नवी दिल्ली- देशभरातील वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल वसुलीच्या पद्धतीत ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून खासगी चारचाकी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) फक्त ३,००० रुपयांमध्ये FASTag आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. या पासमुळे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० टोल क्रॉसिंग (जे आधी पूर्ण होईल) पर्यंत कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर टोलची चिंता करावी लागणार नाही. ही सुविधा केवळ खासगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू असेल. व्यवसायिक वाहने किंवा राज्य महामार्गांवर मात्र ही योजना लागू होणार नाही. गडकरींनी स्पष्ट केले की, हा पास देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर लागू असेल आणि यामुळे दरवेळी टोल देण्याचा त्रास, फास्टॅग रिचार्जचे झंझट आणि टोलवर होणाऱ्या विलंबाला पूर्णविराम मिळेल. वाहनधारकांना आता फक्त एकदाच ३,००० रुपये भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येईल.
या नव्या योजनेमुळे:
- वारंवार टोल देण्याचा त्रास संपेल, विशेषतः ज्या लोकांना दररोज टोल ओलांडावा लागतो त्यांना मोठा दिलासा मिळेल.
- सरासरी एका टोल क्रॉसिंगसाठी खर्च फक्त १५ रुपये येईल, ज्यामुळे वर्षभरात सुमारे ७,००० रुपयांची बचत होईल.
- टोल प्लाझा वर वाहन थांबवण्याची गरज नाही, डिजिटल पेमेंटमुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल.
- ही योजना फक्त FASTag असलेल्या आणि वैध नोंदणी असलेल्या वाहनांसाठीच उपलब्ध असेल.
पास मिळवण्यासाठी ‘राजमार्ग यात्रा’ मोबाइल अॅप किंवा NHAI/MoRTH च्या वेबसाइटवरून अर्ज करता येईल. डिजिटल अॅक्टिवेशन आणि रिन्यूअलचीही सुविधा दिली जाणार आहे.
टोलच्या नव्या धोरणामुळे ट्रॅफिक जाम, तक्रारी, आणि वाद कमी होतील, तसेच देशातील टोल प्रणाली अधिक पारदर्शक आणि डिजिटल होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. ही योजना टोलच्या कटकटीतून कायमची सुटका देणारी ठरणार आहे!