पिंपरी – गंभीर आजाराने व्याधिग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना त्यासाठी विनाशुल्क उपचार मिळावेत म्हणून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी या संस्थेच्या वतीने नरसिंह फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदतनिधी सुपूर्द करण्यात आला. त्यासाठी ‘रोमान्स के रंग डॉक्टर्स के संग’ या चित्रपटगीतांच्या विशेष मैफलीचे निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवार, दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंजुषा शर्मा, इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष शालिनी चोप्रा, सचिव मधुरा प्रधान यांच्यासह क्लबच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून सुमारे चोवीस वर्षांपासून संगीत वाद्यवृंदाच्या माध्यमातून मनोरंजन आणि गरीब रुग्णांची विनाशुल्क वैद्यकीय सेवा करणार्या या समूहात डॉ. सुप्रिया गाडेकर, डाॅ. चंद्रकांत आठले, डॉ. धनश्री कोंढरे, डॉ. विनोद शेलार, डॉ. विभा देशपांडे, डॉ. अब्दुल खान, डॉ. वैयजंती गद्रे, डॉ. अखिलेश आठले हे गायक कलाकार आणि डॉ. दसमित सिंग, डॉ. कमलेश बोकील, डॉ. तेजस जोशी, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, डॉ. मिहीर भडकमकर, डॉ. मोहित नामजोशी, डॉ. संजय खाडे या वादक कलाकारांचा समावेश होता. जागतिक मैत्रीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या बहारदार मैफलीचा प्रारंभ प्रत्येक श्रोत्याला मैत्रीबंधाचे प्रतीक (फ्रेंडशिप बँड) प्रदान करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. शालिनी चोप्रा यांनी प्रास्ताविक केले.
“गुलाबी ऑंखे जो तेरी देखी…” या पहिल्याच गीताला वन्स मोअर मिळवत सुरू झालेली ही शृंगारिक गीतांची मैफल, “मेरे ख्वाबों में जो आये…” , “रुक जा ओ दिल दिवाने…” , “लेकर हम दिवाना दिल…” , “भली भली सी एक सुरत…” , “वादा करो नहीं छोडेंगे मेरा साथ…” अशा एकाहून एक प्रणयरम्य गुलाबी गीतांनी रंगत असताना “मोरनी बागामां…” या पारंपरिक राजस्थानी लोकगीताने अधिकच श्रवणीय झाल्यानंतर “आता वाजले की बारा…” या मराठमोळ्या लावणीमुळे मैफलीने कळसाध्याय गाठला. लावणीतील स्वरांचे लावण्य अन् त्याला अप्रतिम ढोलकीवादनाची साथ यामुळे क्लबच्या पदाधिकारी महिलांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करीत प्रतिसाद दिला. संगीत हे भाषेचा अडसर दूर करून मनामनात पोहोचते याचा प्रत्यय “सुनो सॅनरिटा…” या स्पॅनिश भाषेतील गीताला जी जोरदार दाद मिळाली त्यावरून आला. “कहे दू तुम्हें या चुप रहूं…” , “पुरा लंडन ठुमकदा…” , “परदेशीया, ये सच हैं पियां…” , “कजरा मोहब्बतवाला…” , “कजरा रे कजरा रे…” , “पियां तू अब तो आजा…” अशा एकल, युगुल, समूह गीतांच्या धुंदीने मंत्रमुग्ध करणार्या या मैफलीचा समारोप भारतीय सैनिकांना अभिवादन करणार्या “हवन करेगें…” या समूहगीताने करण्यात आला. इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने नरसिंह फाउंडेशन या संस्थेला गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराप्रीत्यर्थ आर्थिकनिधी सुपूर्द करण्यात आला. डॉ. चंद्रकांत गद्रे आणि डॉ. मानसी अरकडी यांनी मैफलीचे खुमासदार निवेदन केले.