34.7 C
New Delhi
Monday, June 22, 2026
Homeआरोग्यव्यसनमुक्त तरुणाईसाठी जनजागृतीची गरज

व्यसनमुक्त तरुणाईसाठी जनजागृतीची गरज

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम

पुणे : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातर्फे व्यसनमुक्तीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘व्यसनांची होळी’ या उपक्रमाच्या माध्यमातून तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली. या वेळी समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करत युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी तरुणांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी व्यसनमुक्त समाज उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे अनेक तरुण व्यसनाच्या गर्तेत ओढले जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या समस्येविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले. व्यसनांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध माध्यमांतील जाहिराती तरुणांची दिशाभूल करत असल्याचे नमूद करत त्यांनी जनजागृती मोहिमा अधिक व्यापक करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या आयोजिका आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्त तरुणाई घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. युवक जर व्यसनांच्या विळख्यात अडकले, तर त्याचा परिणाम केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच नव्हे तर समाज आणि देशाच्या प्रगतीवरही होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस भवनाच्या पटांगणात प्रतीकात्मक स्वरूपात तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांची ‘व्यसनांची होळी’ करण्यात आली. या उपक्रमातून व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला.

दीप्ती चवधरी यांनी पुढे सांगितले की, व्यसनमुक्तीची चळवळ केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता भविष्यातही विविध शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील सर्व स्तरांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. कल्याण गंगवाल यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करण्याबरोबरच इतरांनाही व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्षाचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी भूषविले. विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसनाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी समाजाच्या सहभागातून या समस्येवर मात करण्याची गरज व्यक्त केली. पुणे शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप्ती चवधरी यांच्या हस्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देत तरुण पिढीला आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
34.7 ° C
34.7 °
34.7 °
35 %
6.4kmh
75 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
41 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments