पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने चालवलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक मुलांना ही लस दिली गेली आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेने पालकांना लसीकरणाच्या महत्त्वाची माहिती देत, अधिकाधिक मुलांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील सर्व आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेची कार्यवाही २५ मार्च २०२५ पर्यंत संपन्न करण्यात आली आहे, ज्यात एकूण २ लाख ७ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले. ही मोहिम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांत आणि केंद्रांमध्ये यशस्वीरित्या राबवली जात आहे.
लसीकरण केलेल्या बालकांची संख्या:
रुग्णालयाचे नाव | लसीकरण झालेल्या बालकांची संख्या |
---|---|
आकुर्डी रुग्णालय | ३०,९९७ |
भोसरी रुग्णालय | ३६,६७९ |
जिजामाता रुग्णालय | ३१,६४० |
सांगवी रुग्णालय | २२,११८ |
तालेरा रुग्णालय | २३,२१२ |
थेरगाव रुग्णालय | १६,७३० |
यमुनानगर रुग्णालय | ३८,०२४ |
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय | ८,१६० |
“बालकांचे आरोग्य हे आपल्या शहरासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून, आम्ही जेई लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवत आहोत. या मोहिमेला पालक, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था यांचे उत्कृष्ट सहकार्य मिळत आहे. भविष्यातही असे परिणामकारक पाऊले आरोग्य क्षेत्रात उचलण्याचे आमचे नियोजन आहे.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
“जापनीज मेंदूज्वर (जेई) हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे, जो सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचवतो. या आजारापासून बचावासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा, अंगणवाड्या आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे जेई लसीकरण राबवत आहे. आमची मोहिम प्रत्येक मुलाचे मोफत लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी चालू आहे.”
–विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
“जेई लसीकरण यापूर्वी घेतले असले तरी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत ती पुन्हा घेणे आवश्यक आहे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि जेईच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.
–डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जेई लसीकरण मोहीम त्याच्या व्यापक कार्यान्वयनामुळे यशस्वी ठरली आहे. पालकांना या मोहिमेचा फायदा होईल आणि जेईच्या प्रकोपापासून आपल्या मुलांचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा आहे.