पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप सुपर ५०० जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ जानेवारी पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. अशी माहिती हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे सचिव उदय साने आणि संयोजन सचिव अभिजीत चांदगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश जाधव, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पीवायसीचे सहसचिव सारंग लागू उपस्थित होते. यावेळी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या लोगोचे अनावरण अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे यंदा १५ वे वर्षे आहे. या स्पर्धेला सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने पारितोषिके देण्यात येणार असून, कॉर्पोरेट अॅथलीट हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. तर योनेक्स सनराइज हे इक्विपमेंट प्रायोजक आहेत.
ही स्पर्धा ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. त्यानंतर पुरुष, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही मोठी स्पर्धा असणार आहे. ३०,३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० वर्षांवरील गटातही ही स्पर्धा होणार आहे. सिद्धार्थ फळणीकर मुख्य पंच तर अजिंक्य दाते उपमुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ५० हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. आजपर्यंत आयोजकांकडून १४ खेळाडूंना अशी स्कॉलरशिप देण्यात आली आहे, आणि सर्व स्कॉलरशिप मिळालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. १४ व्या अमनोरा कप स्पर्धेत २०२४ या वर्षी ५० हजार रुपये आणि २५ हजार रुपये अशा दोन शिष्यवृत्ती हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी कॉर्पोरेट ॲथलीटसचे संस्थापक अभिजित चांदगुडे यांच्याशी संपर्क साधावा.