29.1 C
New Delhi
Tuesday, March 18, 2025
Homeज़रा हट केदगडांच्या चित्रांमधून साकारले गांधीजींचे जीवनकार्य

दगडांच्या चित्रांमधून साकारले गांधीजींचे जीवनकार्य

पुणे : रंग-रेषांनी चित्रे रेखाटताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आजूबाजूला आढळणाऱ्या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करण्याचा कलाविष्कार लेखिका आणि प्रस्तर कलाकार अनिता दुबे यांनी केला आहे. दुबे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन दगडांच्या चित्रांमधून उभे केले आहे. गांधीजींच्या केवळ जीवनदर्शनाचा अनुभव न देता त्यांच्या जीवनकार्याचा अनुभव या चित्रांमधून येतो.

मूळच्या भोपाळ येथील अनिता दुबे सध्या पुण्यातील खराडी येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासून खडे आणि विविधरंगी व आकाराचे दगडे वेचण्याच्या आवडीतून त्यांनी दगडांपासून चित्र काढण्याची कला विकसित केली. या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टतर्फे आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन यावेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन कोथरूड येथील गांधी भवन येथे रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. दगडांपासून तयार केलेल्या चित्रांविषयी आणि या कलेविषयी दुबे म्हणाल्या, माझे बालपण भोपाळमध्ये गेले. उन्हाळी सुट्टीत मी आईसोबत आजोळी जायचे. तेव्हा रोज नर्मदा नदीच्या किनारी आम्ही फिरण्यासाठी जात असू. तेव्हा नर्मदेच्या पात्रातील विविधरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे गोटे उचलण्याची आणि त्याचा संग्रह करण्याची सवय मला लागली. घरांमध्ये खूप गोट्यांचा संग्रह झाल्याने त्याच्याआधारे वेगवेगळ्या डिझाइन मी करू लागले. त्यातूनच चित्र साकारण्याची कल्पना सुचली. लग्न झाल्यानंतर आजोळी जाणे कमी झाले. त्यामुळे नर्मदा नदीशी नातेही कमी झाले. माझे पती वायुदलात होते. त्यामुळे बदली झाली की नवीन राज्यात आणि शहरात तसेच दुर्गम भागात जावे लागायचे. या प्रवासात मी ठिकठिकाणचे खडे, दगडे गोळा केले. पुण्यात राहत असताना लष्करातील एका अधिकाऱ्याने दोन पोती खडे मला दिले. काही वर्षांपूर्वी देशात दंगल सुरू असताना पती म्हणाले की स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही आपल्या देशात जातीय आणि धार्मिक हिंसाचार सुरू आहे. तेव्हा झालेल़्या चर्चेतून मी बापूंचे साहित्य वाचायला घेतले. त्यांच्या विचारांचा, कार्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त़्यातून ही चित्रे काढण्याची कल्पना मला सुचली. बापूंच्या जीवनकार्यावर पन्नास चित्रे मी काढली आहेत. या चित्रांमधील खडे विविधारंगी आहेत. ते तोडून फोडून सजवण्यात आलेले नाहीत. त्यांचा मूळ रंग कायम ठेवण्यात आला आहे. दगड आणि काड्यांचा वापर करून ही चित्रे रेखाटली आहेत. महात्मा गांधी यांना आफ्रिकेत आलेले वर्णद्वेषाचा अनुभव, त्यांचे भारतातील आगमन, स्वातंत्र्य चळवळ, कपड्यांचा त्याग, अहिंसा, सहिष्णुता, सत्याग्रह अशा घटना आणि मूल्यांचे दर्शन या चित्रांमधून घडते. हे प्रदर्शन भोपाळ, दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि पुण्यात हे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर तसेच पुस्तकांचे मुखपृष्ठ म्हणून मी अनेक चित्रे काढली आहेत. या कलेसाठी मला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्रस्तरकलेविषयी…
दगडांना संस्कृतमध्ये प्रस्तर म्हणतात. दगड कापणे, छाटणे आणि आकार तयार करण्यासाठी कोरीव काम करण्याला शिल्पकला म्हणतात. तर दगडांना त्यांच्या मूळ स्वरूपापासून (कणानुसार) मोठ्या आकारात बदलून कोणतीही कापणी आणि छाटणी न करता कलाकृती तयार करण्याचे काम म्हणजे दगडी कला. ज्यामध्ये वेगवेगळ्या आकारांचे आणि प्रकारच्या दगडांचा वापर करून चित्रे काढली जातात, असे अनिता दुबे यांनी सांगितले.


गांधीजींचे विचार आपल्याला नेहमीच मानवतेकडे प्रेरित करतात. त्याचे विचार हे माणसाला योग्य जीवन जगण्याचा मार्ग आहेत. जेव्हा दगडांपासून गांधीजींचे चित्र बनवण्याची कल्पना मला सुचली तेव्हा मला वाटले नव्हते की मी कोणतेही दृश्य जिवंत करू शकेन. जेव्हा मी अचानक गांधीजींच्या काही कल्पनेशी पूर्णपणे सहमत झाले, तेव्हा एके दिवशी मी गांधीजींच्या जीवनावर काम करण्याचा विचार केला. हळूहळू मी दगडावर गांधीजींची चार ते पाच लोकप्रिय चित्रे बनवली. काही काळानंतर, जेव्हा मी पुन्हा गांधीजींवर लिहिलेली पुस्तके वाचली तेव्हा मला वाटले की काही दृश्ये बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी, दांडी यात्रा दगडापासून बनवली गेली होती. त्यानंतरच मी गांधीजींचा जीवनप्रवास दगडात लिहिण्याचा संकल्प केला. मी गेल्या तीन वर्षांपासून गांधीजींवर काम करत आहे. देशाच्या या अमृत महोत्सवात देशभरातून गोळा केलेल्या दगडी कलेद्वारे गांधीजींवर केलेले काम, खडी, धागे, दगड, कागद, बांबूच्या काठ्यांद्वारे, त्या सर्व शहीद देशवासियांना अभिवादन आहे ज्यांच्या प्रयत्नांमुळे आणि बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र आणि प्रगतीशील भारताचे नागरिक आहोत , अशी भावना अनिता दुबे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
4.6kmh
0 %
Tue
32 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!