पुणे : नववर्षाच्या स्वागताला सगळीकडे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन साजरे केले जात आहे. सेलिब्रेशन करताना अनेकांकडून दारू पिण्यास पसंती दिली जाते, परंतु दारूचा एक प्याला पुढे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो, त्यामुळे ‘दारू नको तर दूध प्या’ हा संदेश देत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्त्वात कसबा मतदारसंघात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या म्हणत पुणेकरांना दुधाचे वाटप देखील करण्यात आले.
आमदार हेमंत रासने आणि भाजपा कसबा kasabah vidhansabha मतदारसंघ यांच्या माध्यमातून अलका टॉकीज चौकामध्ये ‘दारू नको तर दूध प्या’ हा उपक्रम राबवला गेला. यावेळी सेलिब्रेशनसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना नववर्षाच्या स्वागताला मद्यप्राशन न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी “दारूची साथ सोडा, आनंदाची वाट जोडा, दुधात ताकद, दारूत विनाश, शरीराची काळजी घ्या, व्यसनमुक्त जीवन जगा आणि दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या” अशा आशयाचे कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी बोलताना आमदार रासने म्हणाले “आपण हिंदू संस्कृती मानत असल्याने गुढीपाडव्यालाच आपले नवीन वर्ष सुरू होते, परंतु जगभरात आज इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू होत असल्याने अनेकांकडून सेलिब्रेशन केले जाते. यामध्ये अनेकांकडून मद्यप्राशन केले जातं असल्याने हे शरीरासाठी अपायकारक असून एक प्याला पुढे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो, त्यामुळे देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणाईने दारू ऐवजी दूध पिऊन सेलिब्रेशन करण्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला. सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.”
यावेळी मतदारसंघाध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, उमेश अण्णा चव्हाण, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, वैशालीताई नाईक राणीताई कांबळे, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढर यांच्यासह मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.