लहानपणापासून साहित्याची आवड पण वडिलांचा व्यवसाय पुढे कार्यान्वित करण्याची जिद्द मनाशी बाळगून आपला विभाग बदलून चक्क ट्रान्सपोर्ट व्यवसायाकडे वळणारी आजची जाई देशपांडे (रणरागिनी) ही सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जाई देशपांडे यांनी सांगितले की, मी ट्रान्सपोर्टर आहे. या क्षेत्रात महिला नाहीत. हे पुरुष प्राधान्य असलेले क्षेत्र आहे. मी खरे तर या क्षेत्रात अपघाताने आले. मी एम.ए. मराठी आहे. शिवाजी विद्यापीठातून बी.ए. आणि एम.ए.ला गोल्ड मेडल मिळाले आहे. माझा सगळा ओढा कलाक्षेत्राकडे होता. त्यातही मराठी साहित्याकडे होता. त्यामुळे असे वाटायचे, की नेटसेट देऊन प्रोफेसर व्हावे. पण २००७ ला माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यावेळी माझे लग्न झालेले होते. मी २००६ ला पुण्यात आले होते. माहेरी मी आणि माझी बहीण – ती सॉफ्टवेअर इंजिनिअर. तर आता हा व्यवसाय कोणी बघायचा, असा प्रश्न आला. वडील थोडे बरे झाले. पण ते शंभर टक्के व्यवसाय पाहू शकतील, इतके ते फिट नव्हते. हा व्यवसाय बंद करायचा नाही, असे ते आणि आई म्हणाली.

त्यांनी जवळ जवळ २५ वर्षे हा व्यवसाय केला होता. एका मराठी माणसाचा व्यवसाय स्थिर आहे, तर तो बंद करण्यापेक्षा पुढे चालवावा, अशी त्यांची इच्छा. त्यांनी मला हा व्यवसाय करायला सांगितले. अशा रीतीने मी खरे तर या व्यवसायात ढकलली गेले. योगायोग म्हणजे माझे मिस्टरपण याच व्यवसायातले. लग्नाच्या वेळेपासून त्यांच्या बसेस होत्या. ते माझ्या पाठीशी उभे राहिले.. आणि आज जवळपास १७ वर्षे मी या व्यवसायात आहे. मला आता उलट असे वाटते, की स्त्रियांनी असे व्यवसाय करावेत. कारण स्त्रीकडे मल्टिटास्किंगची क्षमता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्त्रीकडे प्रचंड सहनशक्ती आणि संयम असतो; जो अशा व्यवसायांमध्ये खूप गरजेचा असतो. हे दोन गुण ती संसारातही वापरतच असते. त्याचाच उपयोग व्यवसायातही होतो. आता आमच्याकडे बस आणि ट्रक आहेत. आम्ही गुड्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्टही करतो. तर ‘गुड्स’चे शंभर टक्के मी पाहाते आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे अधिकृत काम मी पाहाते. जिथे त्यांचा जम बसलेला आहे, तिथे मग मी फार ढवळाढवळ करत नाही. गॅरेज वगैरे विभाग जास्त करून माझे मिस्टर सांभाळतात. पण गॅरेजमध्ये जाण्याची वेळच येऊ न देता वेळच्यावेळी गाडीचे सर्व्हिसिंग किंवा बेसिक गोष्टी पाहिल्या तर मेजर काही निघतपण नाही. हे स्त्रीही करू शकते. कारण उपजत शिकण्याची तिच्यात क्षमता आहे. स्वयंपाकघरासारखे अवघड क्षेत्र जर ती सांभाळते तर हे तर हे तांत्रिक क्षेत्र ती आरामात सांभाळू शकते. पण मी स्वतः मात्र अपघातानेच या क्षेत्रात आले. पण एवढेच सांगेन की, कुठलाही व्यवसाय हा सचोटी व जिद्दीने केला तर त्यात निश्चित यश मिळते.